काकडी मोफत दिली नाही म्हणुन विक्रेत्यावर हल्ला
बेगुसराय – भाजीवाल्याने काकडी मोफत दिली नाही म्हणून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील बेगुसराय येथे घडली आहे. येथील कोर्मापूर रोडवरील भाजीविक्रेत्याने ग्राहकाला मोफत काकडी देण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या या ग्राहकाने भाजीवाल्यावर गोळीबार केला. यामध्ये भाजीवाल्याचा दुर्देवी अंत झाला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीचा आवाज आल्यानंतर परिसरातील सर्व स्थानिक आणि भाजीविक्रेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेऊन गोळीबार करणाऱ्या आरोपीने तेथून पळ काढला. या भाजीवाल्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र अती रक्तस्त्राव झाल्याने या भाजीवाल्याचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरु केली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.