मुंबई – अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा राजस्थानमध्ये फेब्रुवारी महिन्यात विवाह सोहळा पार पडला होता. सध्या हे दोघे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. या दोघांची झलक पाहण्यासाठी चाहते देखील आतुर असतात. यातच आता लग्नानंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. लवकरच कियारा आणि सिद्धार्थ लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
हा चित्रपट शशांक खेतानचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. लवकरच ते या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार आहेत. या चित्रपटात दोघेही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये दिसणार आहेत. ऑगस्टमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे म्हंटले जात आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटातील या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर आता त्यांच्या आगामी चित्रपटासाठी देखील चाहते आतुर झाले आहेत.
दरम्यान, कियारा अडवाणी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या चित्रपटात कियारासोबत कार्तिक आर्यन देखील झळकणार आहे. ‘भूल भुलैया 2’ नंतर कियारा आणि कार्तिकचा हा दुसरा चित्रपट आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तर सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याचा ‘योद्धा’ हा बॉलिवूड चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.