चेन्नई – महाराष्ट्राच्या मेघा आहिरे हिने वेटलिफ्टिंगमध्ये नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले तर ईशा टाकसाळे व पार्थ माने या मराठमोळ्या जोडीनेही नेमबाजीत मिश्र दुहेरीच्या १० मीटर एअर रायफल प्रकरात सुवर्णवेध साधत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील शुक्रवार गाजवला. याचबरोबर वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारेने कांस्यपदक जिंकले.
मनमाड जवळील मांडवड येथील शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मेघा आहिरे हिने वेटलिफ्टिंग मधील ४५ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. तिने क्लीन व जर्कमध्ये स्पर्धा विक्रमाचीही नोंद केली. मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारे याने कांस्यपदक पटकाविले.
मेघा हिने या स्पर्धेतील स्नॅच या प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात ६३ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्क या प्रकारात ८५ किलो वजन असे एकूण १४८ किलो वजन उचलले. पाठोपाठ आंध्र प्रदेशच्या आर. भवानी हिने ८४ किलो वजन उचलून नवा उच्चांक नोंदविला. तथापि मेघाने शेवटच्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलून नवा विक्रम प्रस्थापित केला.
#U19WorldCup2024 : टीम इंडियासह ‘हे’ संघ पात्र ठरले सुपर-6 साठी, ICC ने शेअर केली यादी…
मुलांच्या गटात मात्र मनमाड चा खेळाडू कृष्णा व्यवहारे याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने स्नॅच या प्रकारात ८३ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्कमध्ये त्याने १०१ किलो असे एकूण १८४ किलो वजन उचलले. तो मनमाड येथील गुड शेफर्ड हायस्कूलमध्ये शिकत असून त्याचे या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.
नेमबाजीत ईशा-पार्थ जोडीचा अचूक निशाणा
चेन्नई येथे गुरुनानक महाविद्यालयच्या शूटिंग रेंजमध्ये हरियणा संघाचा १६-६ गुणांनी धुव्वा उडवीत महाराष्ट्राच्या ईशा- पार्थने पदकाची बाजी मारली. अंतिम लढतीत हरियाणा संघाच्या दिशा धनकर व अर्षित अरोरा यांनी सुरुवातीला ६-४ अशी आघाडी घेतली होती. ६व्या फेरीत ईशा-पार्थ यांनी प्रत्येक शॉट अचूक मारताना सहा वेळा २ गुणांची कामाई करताना विजय साकाराला.
Khelo India Youth Games 2023 : महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांचा रौप्यमहोत्सव…
स्टीपलचेसमध्ये अंजलीला सुवर्ण, चैतालीला रौप्य
अतिशय आव्हानात्मक असलेल्या दोन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत महाराष्ट्राच्या अंजली मडवी व चैताली बोरेकर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकून खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समधील शेवटचा दिवस गाजविला. त्याआधी, महाराष्ट्राच्या सिया सावंतची अॅथलेटिक्समध्ये दुहेरी मुकुटाची संधी हूकली. बुधवारी १०० मीटर्स धावण्याचे सुवर्णपदक जिंकणार्या सियाला आज २०० मीटर्सच्या शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याचबरोबर महिलांच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले.