नवी दिल्ली – भाजपने शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारी, सहप्रभारींची नियुक्ती केली. त्यानुसार, विनोद तावडे आणि प्रकाश जावडेकर या महाराष्ट्रातील नेत्यांकडे अनुक्रमे बिहार आणि केरळची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या आणि जवळ येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज होत आहेत. भाजपनेही सज्ज असल्याची ग्वाही देत निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी नेमले. लोकसभेच्या सर्वांधिक ८० जागा असल्याने उत्तरप्रदेश हे राजकीयदृष्ट्या अतिशय निर्णायक राज्य मानले जाते.
त्या राज्याचा निवडणूक प्रभार भाजपने पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांच्यावर सोपवण्यात आला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी पंजाब आणि चंडिगढची जबाबदारी सांभाळतील. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब हरियाणात देखरेख ठेवतील.
तरूण चुघ जम्मू-काश्मीर आणि लडाख, तर मंगल पांडे पश्चिम बंगालमधील पक्षाची निवडणूक सुत्रे सांभाळणार आहेत. निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केल्याने भाजप इलेक्शन मोडमध्ये आल्याचे सूचित होत आहे.