चेन्नई – गतविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लौकिकास साजेशी कामगिरी करताना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील सहाव्या पर्वातही सलग तिसर्या दिवशी पदकांची लयलूट केली. भविष्यातील मेरी कोम असलेली पुण्याची आंतरराष्ट्रीय बॉक्सर देविका घोरपडे, जिम्नॅस्टिकमध्ये आर्यन दवंडे व शताक्षी टक्के, सायकलिंगमध्ये पुण्याचा वेदान्त जाधव, धावपटू सिया सावंत, मल्लखांबमध्ये शार्दूल ऋषिकेश, मृगांक पाथरे व सई शिंदे या खेळाडूंनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरून बुधवारचा दिवस गाजविला. पदकतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्राने 25 सुवर्णपदकांंना गवसणी घालून सुवर्ण यशाचा रौप्यमहोत्सव साजरा केला.
मुलींच्या शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या सिया सावंत हिने १२.१० सेकंदात शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा बहुमान मिळविला. महाराष्ट्राच्या शार्दूल ऋषिकेश वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपदा पाठोपाठ टांगत्या मल्लखांब प्रकारात सुवर्णपदक जिंकून दुहेरी धमाका केला. तसेच त्याने दोरीच्या मल्लखांब प्रकारात रौप्य पदक पटकावीत आपल्या खात्यात आणखी एक पदकाची भर घातली. पुरलेल्या मल्लखांब प्रकारात मृगांक पाथरे हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. मुलींच्या विभागात सई शिंदे हिने पुरलेल्या मल्लखांब प्रकारात सुवर्णपदक जिंकले, तर पलक चुरी हिला कांस्यपदक मिळाले. दोरीच्या मल्लखांब प्रकारात प्रणाली मोरे हिने रौप्य पदक जिंकले.
मुष्टियुद्धात देविका घोरपडे हिने अंतिम लढतीत हरयाणाच्या निधीला सहज पराभूत करताना ५०-५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. मुलांच्या ६०-६३ किलो वजनी गटात अकोल्याच्या गौरव चव्हाणने रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये शेवटच्या दिवशीही वर्चस्व गाजवित मुले व मुली या दोन्ही गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला. आर्यन दवंडेने यंदाच्या या स्पर्धेत आज आणखी दोन सुवर्णपदकांची भर घालून सोनेरी चौकार लगावला. शताक्षी टक्के हिनेदेखील सोनेरी कामगिरी करत महाराष्ट्राच्या यशात कौतुकाचा वाटा उचलला.
आर्यनने समांतर बार या प्रकारात सुवर्णपदक जिंकताना १२.५०० गुणांची नोंद केली. त्याने व्हॉल्ट टेबल या प्रकारातही १३.२०० गुणांची कमाई करीत सुवर्णपदक जिंकले. मुलींच्या फ्लोअर एक्झरसाईज या प्रकारात शताक्षी टक्के व तेलंगणाची निशिका अगरवाल यांचे प्रत्येकी ११.५०० गुण झाले. त्यामुळे सादरीकरणातील अचुकता व कलात्मकता याच्या आधारे शताक्षी हिला सुवर्णपदक, तर निशिकाला रौप्यपदक बहाल करण्यात आले. मुलींच्या बॅलन्सिंग बीम या प्रकारात महाराष्ट्राच्या सारा राऊळ व कृष्णा शहा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले. सायकलिंग स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या टीम स्प्रींट प्रकारात महाराष्ट्राने रौप्यपदक मिळविले होते. स्क्वॉशमध्ये मुलींच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्र संघाने रौप्यपदकाची कमाई केली.
Khelo India Youth Games 2023 : मुष्टियुद्धात महाराष्ट्राच्या ‘देविका घोरपडे’चा सुवर्णपंच
तलवारबाजीत मुलांना कांस्यपदक
तलवारबाजीतील साब्रे सांघिक प्रकारात १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. या संघात शिरीष अंगळ, हर्षवर्धन औताडे, मयूर ढसाळ व स्पर्श जाधव यांचा समावेश आहे. या संघाला अजय त्रिभुवन अजिंक्य दुधारे यांचे मार्गदर्शन लाभले.