पुणे – केंद्र शासनाच्या खेलो इंडिया अभियानांतर्गत ज्यूदो खेळाच्या पश्चिम विभागीय गुणवत्ता शोध निवड समितीवर पुण्याचे दत्ता आफळे आणि अमरावतीचे डॉ. सतीश पहाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकारणातर्फे (साई) ही निवड झालेली आहे. या दोघांना नुकतेच साई प्राधिकरणाचे नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रासह छत्तीसगढ, गुजरात गोवा दादर-नागरा-हवेली या पांच राज्यातील गुणवंत ज्यूदो खेळाडूंचा शोध घेण्याचे काम ही समिती करेल. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे स्थित मुख्यालयी व्यवस्थापकपदी कार्यरत दत्ता आफळे हे राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव असून ते आंतरराष्ट्रीय पंच आहेत आणि यापूर्वी भारतीय ज्यूदो संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आहे.
अमरावतीचे डॉ. सतीश पहाडे हे शासनाच्या राज्य ज्यूदो प्रशिक्षकपदावरून नुकतेच निवृत्त झालेले असून यापूर्वी यांची भारतीय ज्यूदो संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी भारतीय ज्यूदो संघाला अनेक वर्ष प्रशिक्षण दिलेले आहे.
दोघांच्या या निवडीबद्दल राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे कोषाध्यक्ष अँड. धनंजय भोंसले, सातारा यांसह तांत्रिक समिति सचिव शैलेश टिळक, पुणे आणि राज्य कार्यकारिणीने या दोघांचे अभिनंदन केले आहे.