Khelo India University Sports Tournament, पुणे – इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या चौथ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत अभिजित दिसले याने ८९ किलो वजनी गटात विक्रमी ३०२ किलो वजन उचलून वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि संकटांवर मात करून त्याने यशाला गवसणी घातली आहे.
अभिजित दिसले हा पुणे येथिल भारतीय जैन संघटना कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात २०२३ पासून प्रथम वर्ष कला या वर्गात शिक्षण घेत आहे. लहानपणीच त्याचे आई-वडील विभक्त झाल्याने तो आईसोबत आजोळी मामाकडे तळेगाव दाभाडे येथे राहतो. त्याचे शालेय शिक्षण तेथेच पूर्ण झाले.
आई शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम करून आपला उदरनिर्वाह करते. मात्र, आपल्या मुलाला शिक्षण-खेळासाठी प्रोत्साहन देत आहे. अभिजीत हा शिक्षण घेत वेटलिफ्टिंगचा कसून सराव करतो. शिवाय रात्रपाळीत तो दुसर्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करून कुटुंबाला हातभार लावतो, पण वेटलिफ्टिंगच्या सरावात मात्र खंड पडू देत नाही. घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करुन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पदक मिळविण्याचे ध्येय अभिजितने ठेवले आहे.
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था म्हणाले, ‘राष्ट्रीय पातळीवर अभिजितने बीजेएसच्याच नव्हे, तर पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून त्याचा संस्थेला अभिमान आहे. अफाट प्रतिभा, कौशल्य असणार्या, पण घरची परिस्थिती नसलेल्या या विद्यार्थ्यास बीजेएस आवश्यक सर्व सहकार्य करणार आहे.’
या घवघवीत यशाबद्दल शांतिलाल मुथ्था, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अरुण नहार, प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रमेश गायकवाड, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिजितचे अभिनंदन केले आहे.
शैक्षणिक वर्ष- २०२३-२०२४ मधील अभिजित अंकुश दिसले याचे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य –
१. हुतात्मा राजगुरुनगर, खेड येथे पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग (मुले) स्पर्धेत २६० किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले.
२. लोणावळा येथे झालेल्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये २८० किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले.
३. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धा विंझर महाविद्यालयात आयोजित स्पर्धेत २८४ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.
४. संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत २८८ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले व अरुणाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या सघात निवड झाली.
५. आदि कवी ज्ञानया विद्यापीठ आंधप्रदेश येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत २९४ किलो वजन उचलून रौप्य पदक पटकाविले व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता निवड झाली.
६. इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत २९७ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले.
७. चंदीगड विद्यापीठ, मोहाली येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत २९३ किलो वजन उचलून ४ था क्रमांक मिळविला.
८. राजीव गांधी विद्यापीठ इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत ३०२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.