खेड : महसूल विभागात कोरोनाचा शिरकाव

उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांचा अहवाल पाॅझिटिव्ह

राजगुरूनगर(प्रतिनिधी) : खेडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांचा करोना स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान तालुक्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८०९ च्या पुढे गेली आहे.

खेड तालुका करोना विषाणू संसर्गाने बाधित झाला असून आता शासकीय कार्यालयात घुसला आहे. खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांचा करोना स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. त्यांच्या पूर्वी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना करोना झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या १९ पोलिसांचा स्वॅब अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आला आहे.

प्रांत अधिकारी यांना करोनाची लागण झाल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालय काही दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे. या कार्यालयातील अनेक कर्मचारी प्रांताधिकारी यांच्या संपर्कात असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला आहे. संजय तेली यांना आठ दिवसांपासून टायफाईड आजार होता. त्यावर ते  उपचार  घेत होते. तेथूनच ते कार्यालयीन कामकाज करीत होते. मंगळवारी त्यांचा स्वॅब घेण्यात आला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत तरीही संपर्कांत आलेल्या व्यक्ती, अधिकारी यांनी काळजी घ्यावी असे आवाहन  केले आहे.

खेड तालुक्यात आतापर्यत ८०९ व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ४३० व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. ३६७ व्यक्ती उपचार घेत आहेत. दोन दिवसात तालुक्यात तब्बल १३० व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. २११ व्यक्तींचे स्वॅब अहवाल येणे बाकी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.