पावसाअभावी खरीप हंगाम लांबणार

बळीराजाच्या नजरा आभाळाकडे : पावसाच्या आगमनाबाबत अनिश्‍चिततेची चिंता

पुणे – दुष्काळामुळे यंदा तर पिके वाया गेली आहेतच! तर दुसरीकडे जून महिन्याचा पंधरवडा संपला तरी अद्याप पावसाचे आगमन झाले नसल्याने यंदाचा खरीप हंगाम सुद्धा लांबणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गतवर्षी पाऊस जरी वेळेवर आला असला तरी तो जास्त बरसला नाही. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच परतीचा मान्सूनने ओढ दिली. त्यामुळे मराठवाड्यात यंदा रब्बीचा हंगाम घेता आला नाही. आता शेतकऱ्यांचे लक्ष खरिपावर आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत; पण पावसाच्या आगमानबाबत सध्या असणाऱ्या अनिश्‍चितेमुळे चिंता वाढली आहे. हवामान खात्याने सुद्धा शेतकऱ्यांना तुर्तास पेरण्या करून नयेत असाच सल्ला दिला आहे. शेतकरी सध्या जमिनीच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे.

राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली जाते. राज्यात ऊस क्षेत्र वगळून तब्बल 140.69 लाख हेक्‍टर क्षेत्र हे खरिपाचे आहे. या काळात साधारणतः भात, सोयाबीन, नाचणी, कापूस, कडधान्ये आदी पिके घेतली जातात. सध्या राज्यात कोकण वगळता कुठेही पाऊस सुुरू झालेला नाही. त्यामुळे सगळीकडे परिस्थिती गंभीर बनली आहे. कोकणात सुद्धा गेले दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. या पावसाला सुद्धा जोर नसल्याने शेतीच्या कामांना वेग आलेला नाही. महाराष्ट्रातील इतर ठिकाणी तर अद्याप पूर्व मोसमी पाऊस सुद्धा झालेला नाही.

गेले आठ महिन्यांपासून दुष्काळाच्या छायेत असणारा शेतकरी आता चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. मान्सून सध्या हुलकावणी देत आहे. अद्याप मान्सून केरळात म्हणावा तसा सक्रिय झालेला. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल व्हायला सात ते आठ दिवस लागणार आहे. त्यानंतरच पावसाचा जोर वाढेल अशी शक्‍यता आहे. यंदा जून कोरडा जाऊन जुलै मध्येच पाऊस बरसणार चिन्हे आहेत.

कृषी विभाग वेट अँड वॉच स्थितीत
जून महिना सुरू झाला की कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाची तयारी सुरू करण्यात येते. राज्याच्या हवामान विभागाकडून सुद्धा वेळोवेळी कल्पना दिली जाते; पण अद्याप पाऊसच नसल्याने कृषी विभागाने सुद्धा कुठल्याच हालचाली सुरू केलेल्या नाहीत. खरिपासाठी लागणारे बि-बियाणे तसेच कीटकनाशकांचा साठा सुद्धा तयार ठेवला आहे; पण पाऊस नसल्यामुळे कृषी विभागसुद्धा वेट अँड वॉचच्या स्थितीमध्ये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.