पुणे – पुणे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरण 96 टक्के क्षमतेने भरले आहे (Khadakwasla Dam 96 percent full). धरण क्षेत्रात सतत पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पाऊस सुरु राहिल्यास किंवा तो वाढल्यास परिस्थितीनुसार आज रात्री (दि. 29 सप्टेंबर) खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच नदीपात्रात साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, खडकवासला धरणात बुधवारी (दि. 27 सप्टेंबर) 81 टक्के पाणीसाठा होता. मात्र गेल्या दोन दिवसांत धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने सध्या धरणाची पाणी पातळी वाढली असून धरण 96 टक्के क्षमतेने भरले आहे.