Ganpati Visarjan 2023 – गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांत किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. यात सर्वाधिक नाशिकमधील 6 जणांचा समावेश आहे.
नाशिकमधील पंचवटी येथे तीन, तर नाशिकरोड भागात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. तसेच साताऱ्यातील उंब्रज, नांदेडमधील वजिराबाद आणि रायगडमधील कर्जत येथे प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे, असेही ते म्हणाले.
राज्याच्या कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात मूर्ती विसर्जन मिरवणुकीत वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यात 17 वर्षीय मुलगी आणि टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. याशिवाय मुंबईतील जुहू येथे गुरुवारी विसर्जनाच्या वेळी एका 16 वर्षीय मुलाला समुद्रकिनाऱ्यावरून वाचवण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.