खडकवासला – खडकवासला सिंहगड परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध होत असुन आज (गुरुवारी ) डोणजे येथील शेतक-यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने बैल गंभीर जखमी झाला आहे.
डोणजे (ता.हवेली) येथील शेतकरी तानाजी पारगे यांनी आज सकाळी बैल रानात चरायला सोडला होता. यावेळी डोणजे गावापासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने किंवा हिंस्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला आहे. बैलाच्या दोन्ही पायावर, मानेवर, शेपटीवर गंभीर मोठ्या जखमा दिसून आल्या आहेत.
डोणजे लगत गो-हे बु. गावच्या हद्दीतील उच्चभ्रूंची समजली जाणारी विल्डरनेस्ट सोसायटी असून याच परिसरात हा प्रकार घडला आहे. सकाळी रानात सोडलेला बैल घरीआणण्यासाठी पारगे गेले असता त्यांचा बैल जखमी अवस्थेत दिसला. त्यांनी स्थानिकांना माहिती दिली असता येथे बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात आले.
विल्डरनेस्ट सोसायटीत धनिक उद्योजकांची घरे, फार्महाऊस असून सुट्टीच्या दिवशी ते वास्तवास येथे असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डोणजे,डीआयएटी, घेरा सिंहगड, कल्याण ,कोंढणपूर या गावाच्या लगत घनदाट जंगल असल्याने वाघ ,बिबट्या व इतर हिंस्र प्राणी असुन त्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी समस्त गावकरी डोणजे यांनी केली .
वनविभागाने येथे वाघ, बिबटे असतील तर त्यांचा बंदोबस्त करावा, त्यांना पकडुन वेळीच जंगलात सोडण्यात यावे असे स्थानिक शेतकरी तानाजी पारगे यांनी सांगितले.