वाघोली, (प्रतिनिधी)- बाहेर जात असताना फ्लॅट बंद करून चावी चप्पल स्टँडमधील बुटात ठेवून गेल्यानंतर चप्पल स्टँडमधील चावीचा फायदा घेऊन घरातील जवळपास साडे दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, 36 तोळे चांदीचे दागिने व 15 हजारांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन आयफोन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. चोरीची घटना वाघोली-आव्हाळवाडी रोडच्या ब्लीथ आयकॉन सोसायटीत 26 जानेवारी रोजी घडली होती.
सूरज शंकर राऊत (रा. वाघोली) असे चोरीच्या घटनेत अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले असताना दुपारी फिर्यादी यांनी दरवाजा लॉक लावून घराची चावी चप्पल स्टँडच्या बुटामध्ये ठेवली होती. संध्याकाळी घराच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस तपास करीत होते. पोलिसांनी सोसायटी व वाघोली परिसरातील विविध सीसीटीव्ही तपासले असता वाघोली येथील रेकॉर्डवरील संशयित सूरज राऊत यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 तोळे सोने, 11 तोळे चांदी व तीन आयफोन जप्त करण्यात आले आहेत.