पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दस्त नोंदणीसाठी सहजिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर या कार्यालयाअंतर्गत सर्व सहदुय्यम निबंधक वर्ग-२ हवेली क्र. १ ते २७ कार्यालये २९ ते ३१ मार्च शासकीय सुट्टीच्या कालावधीत सुरू राहणार आहेत.
यावर्षी मार्च अखेरीस दि. २९ रोजी गुड फ्रायडे, दि. ३० – चौथा शनिवार आणि दि. ३१ रोजी रविवार अशा सलग सुट्ट्या आल्या आहेत. तर, दुसऱ्या बाजूला वार्षिक बाजारमूल्यदर तक्ते दि. १ एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होते.
महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी तसेच दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. सहजिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर हे कार्यालयदेखील अभिनिर्णय, अभय योजना तसेच इतर कामकाजासाठी सुरु राहणार आहे, अशी माहिती पुणे शहरचे सहजिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली आहे.