कोझिकोडे – केरळमध्ये शुक्रवारी एअर इंडिया एक्सप्रेस विमान IX-1344 लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरून ५० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे होऊन १८ जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती समजताच विमानतळावरील संबंधित अधिकारी व स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य हाती घेत अनेकांचे प्राण वाचवले.
या दुर्घटनेनंतर पहिल्या पाच मिनिटांमध्ये काय-काय हालचाली करण्यात आल्या याबाबतची माहिती एनडीटीव्ही या वृत्त संकेतस्थळाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सुत्रांकरवी दिली आहे. या वृत्तामध्ये, विमान दुर्घटनेच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये आवश्यक पावले उचलण्यात आल्यानेच एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही मृतांचा आकडा कमी ठेवण्यात यश आल्याचं म्हंटलंय.
विमान दुर्घटनेनंतर पहिल्या पाच मिनीटांमध्ये ‘हे’ घडलं
७ वाजून ४० मिनिटे – एअर इंडिया एक्सप्रेस बोईंग ७३७ विमान धावपट्टीवरून घसरून ५० फूट खोल दरीत कोसळले. यावेळी उपनिरीक्षक अजित सिंग हे गेट नंबर ८ वर उपस्थित होते. त्यांनी पुढच्या काही सेकंदांमध्येच याबाबतची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कंट्रोल (सीआयएसएफ) रूमला कळवली. मुळात विमानतळांवरील लँडिंग व उड्डाण स्थळांवर काही इमर्जंसी परिस्थिती उद्भवल्यास माहिती देण्यासाठी क्रॅश गेटची उभारणी केलेली असते.
७ वाजून ४१ मिनिटे – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) कंट्रोल रूमने प्राप्त माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष व सीआयएसएफ शीघ्र प्रतिसाद तुकडीला कळवली.
७ वाजून ४२ मिनिटे – विमान दुर्घटनेची माहिती विमानतळावरील अग्निशमन स्टेशनला देण्यात आली.
७ वाजून ४३ मिनिटे – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) कंट्रोल रूमने विमानतळावरील आरोग्य विभागाला दुर्घटनेची माहिती दिली.
७ वाजून ४४ मिनिटे – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) कंट्रोल रूमने विमानतळाचे टर्मिनल व्यवस्थापक व विमानतळ संचालकांना दुर्घटनेची माहिती दिली. विमानतळ आरोग्य विभागाला दुसरा फोन करण्यात आला.
७ वाजून ४५ मिनिटे – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) कंट्रोल रूमने दुर्घटनेची माहिती स्थानिक पोलीस व इतर यंत्रणांना दिली.
विमान दुर्घटनेला ५ ते ७ मिनिट उलटल्यानंतर क्रॅश गेटजवळ स्थानिक नागरिक जमले होते. दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांची संख्या पाहता संबंधित अधिकाऱ्यांनी मदत कार्यासाठी काही मोजक्या स्थानिक नागरिकांना विमानतळ परिसरात प्रवेश करण्याची परवानगी दिली.