विमान दुर्घटनेनंतर स्थानिकांनी दाखवलेल्या माणुसकीला डॉक्टरांचाही सलाम; म्हणाले…

कोझिकोडे – येथील महाभयानक विमान दुर्घटनेतील दहापैकी सहा लहानग्यांचे प्राण वाचले असून डॉक्टरांनी याचे श्रेय मदतकार्यात झोकून दिलेल्या स्थानिकांना दिलंय. शुक्रवारी रात्री एअर इंडिया एक्स्प्रेस विमान धावपट्टीवरून घसरत ५० फूट दरीत कोसळले होते. हा अपघात इतका भयानक होता की, विमानाचे दोन तुकडे झाले. कोरोनामुळे दुबई येथे अडकलेले भारतीय वंदे भारत मिशनच्या माध्यमातून मायदेशी परतत होते. मात्र खराब वातावरणामुळे विमानाला अपघात झाला.

अपघाताबाबत माहिती मिळताच विमानतळावरील संबंधित कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. जखमींना विमानाच्या मलब्यातून बाहेर काढण्यापासून ते त्यांना दवाखान्यापर्यंत पोहचवण्यामध्ये स्थानिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.

विमानामध्ये काही कुटुंब प्रवास करत असल्याने त्यांच्यासोबत लहान मुले देखील होती. अपघातानंतर सर्वच प्रवासी प्रचंड धक्क्यात होते. काही प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या तर काही जण किरकोळ जखमी होते. अशा प्रचंड गोंधळाच्या वातावरणात देखील स्थानिकांनी समयसूचकता दाखवत लहानग्यांना कोझिकोडे येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

येथील प्रत्यक्षदर्शी डॉक्टर याबाबत सांगतात, “स्थानिकांनी दाखवलेल्या माणुसकीला सलाम. त्यांनी जखमी लहानग्यांची पोटच्या पोरांप्रमाणे काळजी घेतली. दवाखान्यामध्ये आणलेल्या एकाही मुलाला पालकांचं सोडा स्वतःचंही नाव सांगता येत नव्हतं. ते धक्क्यात होते. त्यांच्याकडे पासपोर्टही नव्हता.”

“या सर्व सहा मुलांना रेस्क्यू टीम व स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना हाताळणं आम्हाला जड जात होत. मात्र स्थानिकांनी व्हॅट्सऍपचा वापर करत अवघ्या चार तासांमध्ये सर्व मुलांच्या पालकांशी संपर्क प्रस्थापित केला.”

या महाभयानक अपघातामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये विमानाचे दोन्ही पायलट, बारा प्रौढ प्रवासी व चार बालकांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर अजय यांनी, “येथे दाखल असलेल्या दोन मुलांना अपघातात आपल्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अशावेळी कुटुंबातील सदस्य जवळ असणे फार महत्वाचे असते.” असं सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.