कोझिकोडे – विमान अपघाताच्या चौकशीसाठी एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, नागरी उड्डाण महासंचालक कार्यातील अति वरिष्ठ अधिकारी कोझिकोडे येथे दाखल झाले आहेत. या प्रकरणी चौकशीचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी येथे जातीने दाखल झाले अहोत.
विमानाचा डिजिटल फ्लाईट डाटा रेकॉर्डर (डीएफडीआर) आणि कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर (सीव्हीआर) ताब्यात घेतला आहे. विमान अपघात अन्वेषण संस्थेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे पुरी यांनी स्पष्ट केले.
या अपघातात मरण पावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत आणि गंभीर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. किरकोळ जखमींना 50 हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा पुरी यांनी केली.
आणखी एका जखमीचा मृत्यू
या अपघातात जखमी झालेल्या आणखी एका प्रवाशाचा शनिवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 18 वर पोहोचली. या अपघातात सापडलेल्या सर्वांची ओळख पटली आहे, अशी माहिती मल्लपुरमचे जिल्हाधिकारी के. गोपालकृष्णन् यांनी दिली.
या अपघातात जखमी झालेल्या 149 प्रवाशांपैकी 16 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात एअर इंडियाचे चारही कर्मचारी सुरक्षित असल्याचे कंपनीने कळविले आहे. मात्र ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे कंपनीतील युनियनने म्हटले आहे.