नवी दिल्ली – केरळमधील एका 17 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना यकृताचा काही भाग दान करून जिवदान दिले आहे. यासह ती देशातील सर्वांत कमी वयाची अवयवदाता बनली आहे. 12 इयत्तेत शिकत असलेल्या देवानंदा हिने आपल्या आजारी वडिलांना वाचवण्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी यकृताचा एक भाग दान केला. यासाठी तिने केरळ उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.
न्यायालयाच्या परवानगीनंतर देवानंदाने आपले 48 वर्षीय वडील प्रतिश यांच्यासाठी यवयव दान केले. प्रतिश त्रिशूरमध्ये एक कॅफे चालवतात. देवानंदाने आपले यकृत दान करण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत रहावे यासाठी नियमित व्यायामासह आहारात आमूलाग्र बदल केले. अलुवा येथील राजगिरी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
देवानंदाच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करत रुग्णालयाने शस्त्रक्रियेचा खर्च माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभर रुग्णालयात राहिल्यानंतर देवनंदा हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कुटुंबाला योग्य दाता न मिळाल्याने देवानंदाने आपल्या यकृताचा एक भाग वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला होता.
अल्पवयीनांना अधिकार नाही
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 मधील तरतुदींनुसार अल्पवयीन मुलांना अवयवदान करण्याची परवानगी नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी देवानंदाच्या कुटूंबियांनी सर्व शक्यतांचा शोध घेतला आणि केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. अशाच एका प्रकरणात न्यायालयाने एका अल्पवयीन मुलाला अवयवदानाची परवानगी दिली होती. त्याचाच आधार घेत न्यायालयाने देवानंदाला अवयव दानासाठी हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर शस्त्रक्रिया पार पडली.