थिरूवनंतपूरम – केरळ सरकारने आपल्या राज्यातील करोनाच्या मदतीचे दुसरे पॅकेज जाहीर केले असून हे पॅकेज 20 हजार कोटी रुपये मदतीचे आहे. अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज जाहीर केला. त्यात याची घोषणा करण्यात आली आहे.
त्या खेरीज राज्याच्या अर्थसंकल्पात लसीकरणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामात जे अन्य साहित्य व सुविधा लागणार आहेत त्यासाठीही पाचशे कोटी रुपये वेगळे काढून ठेवण्यात आले आहेत.
करोनाच्या पहिल्या लाटेत विजयन सरकारने 20 हजार कोटी रुपये मदतीचे पॅकेज राज्यातील जनतेसाठी जाहीर केले होते. त्या पॅकेजची परिणामकारपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी अन्न या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे.