जिनिव्हा – भारतात ऑक्टोबर 2020मध्ये आढळलेल्या बी.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा व्हेरियंट म्हटले गेले आहे. तर दुसऱ्या बी.1.617.1 स्ट्रेनचे नामकरण कप्पा असे केले गेले आहे. भारतासोबतच इतर देशांमध्ये आढळलेल्या व्हेरियंटचेही नामकरण केले गेले आहे. आता यातील डेल्टा व्हेरियंटचे एक विषाणू स्वरूपच (स्ट्रेन) फक्त घातक असून इतर दोन प्रकारांचा धोका कमी झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नमूद केले आहे.
भारतात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला. दुसऱ्या लाटेपाठीमागे भारतात करोना विषाणूचे बी.1.617 हे बदलले स्वरुप कारणीभूत होते, असे सांगितले आहे. हे विषाणू स्वरुप तीन म्यूटेंट व्हेरिएंट आहे. कारण या स्वरुपातून विषाणू तीन लिनिएजमध्ये पसरला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, भारतात विषाणूची दुसरी लाट पसरण्यापाठीमागे डेल्टा व्हेरियंटची महत्त्वाची भूमिका होती. डेल्टा व्हेरियंट अल्फापेक्षा 50 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे विषाणू संक्रमण वेगाने होते.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच भारतात आढळलेल्या करोना स्ट्रेनला भारतीय म्हणण्यावरून वाद झाला होता. केंद्र सरकारने त्या बातम्यांवर आक्षेप घेतला होता. ज्यात जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या बी.1.617 व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट नाव दिल्याचे म्हटले गेले होते.
दरम्यान, भारतीय व्हेरियंट या शब्दावर सरकारने आक्षेप घेतल्यानंतर डब्ल्यूएचओनेही यावर प्रतिक्रिया दिली होती. डब्ल्यूएचओने ट्विटरवर म्हटले होते, की जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही व्हेरियंटला देशाच्या नावावरून नाव देत नाही. संघटना व्हायरसच्या स्वरुपाला त्याच्या शास्त्रीय नावानेच संबोधित करते आणि इतरांनीही असेच करावे, अशी आशा असल्याचे नमूद केले होते.