नवी दिल्ली – पुढील आठवड्यात स्पेनमधील हुएल्वा येथे सुरु होणाऱ्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून जपानच्या विद्यमान विजेत्या केन्टो मोमोटाने माघार घेतली आहे. पाठदुखीतून पूर्ण सावरला नसल्याने त्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती बीडब्ल्यूएफने दिली आहे. दुखापतीमुळे मागील स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती.
ट्रेनिंगच्या वेळी त्याला दुखापत झाली होती. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घ्यावी लागत असल्याने त्याने दिलगिरी व्यक्त केली असल्याचेही बीडब्ल्यूएफने सांगितले. दरम्यान रविवारपासून सुरू होणाऱया स्पर्धेसाठी अनेक खेळाडू स्पेनमध्ये पोहोचले असून ते बायोबबलमध्ये राहत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
माघारीमुळे नवा ड्रॉ काढणार नसल्याचेही बीडब्ल्यूएफने स्पष्ट केले. कोरोना महामारीच्या मोठय़ा कालावधीनंतर बॅडमिंटन स्पर्धांना पुन्हा सुरुवात झाली होती. मोमोटाने एकूण 6 स्पर्धांत भाग घेतला होता.
पण प्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने आपल्याच देशाच्या कांता त्सुनेयामाविरुद्ध माघार घेतली होती. इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर, आपल्याला खूप थकवा जाणवत असल्याची तक्रार त्याने केली होती.