राहाता -निळवंडे कालव्याची पहिली चाचणी झाली, त्या वेळी केलवड ते दगड पिंपरी गावातील कालव्याच्या मोरीचे काम बाकी राहिल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे या कामासाठी खा. सदाशिव लोखंडे यांनी खासदार निधीतून पाच लाख देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तत्काळ हे काम सुरू होणार असून, केलवडला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
तालुक्यातील केलवड गाव हे 182 गावांपेक्षा अतिसंघर्ष करणारे गाव म्हणून ओळखले जाते. परंतु याच गावात निळवंडे कालव्याचे पाणी न आल्याने शेतकरी संतप्त झाले होते. यामुळे खा. लोखंडे यांच्या जनता दरबारात केलवड गावातील 10 ते 15 शेतकरी गेले. या वेळी मी केलवड गावात येतो असे खा. लोखंडे यांनी सांगितले. सोमवारी (दि. 9) दुपारी 2 वाजता खासदारांनी केलवडला येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर बैठक घेतली. या वेळी जलसंपदाचे अधिकारीदेखील उपस्थित होते.
केलवड हा भाग कोपरगाव शाखेत येतो. यासाठी निविदा काढल्या आहेत. परंतु ठेकेदार निवडला नसल्यामुळे या कामाला दिवसेंदिवस उशीर होत असल्याने निळवंडे कालव्याच्या दुसऱ्या चाचणीतदेखील केलवड गाव पाण्यापासून वंचित राहिले. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले होते. या शेतकऱ्यांनी खा. लोखंडे यांची भेट घेऊन या प्रकाराबाबत तक्रार केली. त्यावर खा. लोखंडे यांनी तत्काळ 5 लाख देण्याचे कबूल करत जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून रक्कम वर्ग करण्याची सूचना दिली.
गावच्या पाणीप्रश्नासाठी खा. लोखंडे यांनी निधी दिल्यामुळे खा. लोखंडे यांचे शेतकऱ्यांनी अभिनंदन केले. या वेळी खा. लोखंडे यांनी गावातील दोन तलावदेखील भरून काढण्याच्या सूचना या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, शाखा अभियंता विवेक लव्हाट, गंगाधर गमे, सरपंच दीपक कांदळकर, नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे आदी उपस्थित होते.
निळवंडेसाठी संघर्ष करण्याचा जन्म हा केलवड गावात झाला. आजपर्यंत अनेक नेते झाले; परंतु खा. सदाशिव लोखंडे यांनी केलवड गावच्या पाणीप्रश्नासाठी निधी दिल्याने तो मार्गी लागणार आहे.
गंगाधर गमे, केलवड, ता राहाता