अहमदाबाद – आम आदमी पक्षाने (आप) चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या गुजरातकडे लक्ष केंद्रित केले आहे. गुजरातमधील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल दर आठवड्याला त्या राज्याचा दौरा करणार आहेत.
केजरीवाल यांनी सोमवारी गुजरातला भेट देऊन अहमदाबादमधील जनतेशी संवाद साधला. गुजरातमधील जनतेशी संवाद साधण्यासाठी दर आठवड्याला येण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. मोफत वीज, भ्रष्टाचार आणि शेती हे मुद्दे आप गुजरातमध्ये प्रामुख्याने लावून धरणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
आपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होते हे दिल्ली आणि पंजाब अनुभवत आहे. दिल्लीतील 73 टक्के आणि पंजाबमधील 80 टक्के जनतेला मोफत वीज उपलब्ध करण्यात आली आहे. गुजरातमधील जनतेलाही मोफत वीज मिळू शकेल. अट फक्त सरकार बदलण्याची, असे म्हणत केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आपला संधी देण्याचे आवाहन केले.
गुजरातमध्ये प्रदीर्घ काळपासून भाजपची सत्ता आहे. त्या पक्षाचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून कॉंग्रेसकडे पाहिले जाते. मात्र, यावेळी थेट भाजपला पर्याय बनण्याचा निर्धार आपने केला आहे.