नवी दिल्ली – देशभरात विस्तारण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आम आदमी पक्षाचा (आप) प्रभाव वाढत असल्याचे संकेत एका सर्वेक्षणातून मिळत आहेत. त्या सर्वेक्षणानुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी मतदारांची प्रथम पसंती ठरले आहेत.
उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांपूर्वी मतदारांचा मूड जाणून घेण्यासाठी एबीपी न्युज आणि सी-व्होटरने संयुक्तपणे एक सर्वेक्षण केले.
त्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री म्हणून मतदारांची कुणाला पसंती आहे याविषयीची चाचपणी करण्यात आली. पंजाबमध्ये सर्वांधिक 22 टक्के मतं केजरीवाल यांच्या वाट्याला आली. दुसरे स्थान शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल (19 टक्के) यांना मिळाले. तर, विद्यमान मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अमरिंदर सिंग यांना 18 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली. आपचे खासदार भगवंत मान यांना 16 टक्के, तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना 15 टक्के मतदार मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित असल्याचे आढळले.
गोव्यात विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत (33 टक्के) संभाव्य उमेदवारांच्या खूप पुढे आहेत. गोव्यातही आपचा जनाधार वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवाराला (14 टक्के) दुसरे स्थान मिळाले आहे.
उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता कायम असल्याचे दिसते.
ते त्या पदाचे सर्वांधिक पसंतीचे उमेदवार ठरले आहेत. त्यांना 40 टक्के मतदारांनी कौला दिला आहे. सपचे अध्यक्ष अखिलेश यादव (27 टक्के) दुसऱ्या, तर बसपच्या प्रमुख मायावती (15 टक्के) तिसऱ्या स्थानी आहेत. उत्तराखंडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते हरीष रावत यांना सर्वांधिक 31 टक्के मतं मिळाली आहेत.