नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये करोना विषाणूची लागण झालेले आणखीन तीन रुग्ण मिळाल्याच्या पार्श्वभुमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला करोना प्रभावित देशांवर प्रवासी बंदी घालण्याचे आवाहन केले आहे. ही विनंती आपण केंद्रीय आरोग्य मंत्री यांना स्वतः भेटून करणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले आहे. करोना प्रभावित देशांमधून भारतात आलेल्या सर्व रुग्णांच्या चाचण्या “पॉझिटिव्ह’ आल्या आहेत. त्यामुळे या सर्व देशांवर प्रवासी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आपण आरोग्य मंत्र्यांकडे करणार आहोत, असे ते म्हणाले.
यापूर्वी इटली, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना 3 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी देण्यात आलेले व्हिसा किंवा ई व्हिसा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे.
दिल्लीमध्ये करोनाची लागण झालेले 3 रुग्ण आहेत. तर एक रुग्ण संशयित करोना बाधित आहे. यातील पहिला रुग्ण 105 जणांच्या संपर्कात आलेला होता. दुसरा रुग्ण 168 जणांच्या संपर्कात आला होता. तर तिसऱ्याचा संपर्क 64 जणांशी आलेला होता. या तिन्ही रुग्णांना घरीच स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले गेले आहेत. दिल्लीच्या विमानतळावर 40 डॉक्टरांचे पथक तपासणी करत आहे. आतापर्यंत गेल्या 14 दिवसात 1 लाख 40 हजार 603 जणांची तपासणी करण्यात आली आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.