पुणे – पुणे महानगर पालिकेतर्फे पुणे महापौर करंडक जिल्हास्तरीय टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 9 ते 24 मार्च या कालावधीत होणार असून स्पर्धेत विविध क्लबचे संघ सहभागी होणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना पुणे मनपाचे नगरसेवक आणि स्पर्धेचे क्रिडा आयोजक राजेंद्र शिळीमकर यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 24 निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे सामने नेहरू स्टेडियम मैदान, पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुना क्लब आणि ब्रिलीयंट स्पोर्टस् ऍकॅडमी, येवलेवाडी या मैदानावर होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन 9 मार्च रोजी आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेडगे आणि अध्यक्ष हेमंत रासने यांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र, स्टेडियम क्रिकेट क्लब, पीवायसी, डेक्कन जिमखाना, पुणे महानगर पालिका संघ, इलेव्हन स्टार क्रिकेट, पुना क्लब, ओम क्रिकेट क्लब, पुणे पोलिस संघ, पुनील बालन संघ, सय्यद क्रिकेट ऍकॅडमी, सम्राट थोरात वॉरीयर्स, निंबाळकर वॉरीयर्स या सारखे संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेत एकूण 1 लाख 35 हजार रुपयांची रोख पारितोषिके व करंडक देण्यात येणार आहे. विजेत्या संघाला 40 हजार रुपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला 25 हजार रुपये आणि करंडक मिळणार आहे.
तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 15 हजार रुपये आणि करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.