कराड – निसर्गाची वेगवेगळी रूपं दाखवित श्रावण जसा सर्वांना मोहित करतो तसा विविध सण, व्रतांमुळे तो प्रत्येकाचा भक्तिभावही वाढीस लावत असतो. त्यामुळे या महिन्याचे पावित्र्य मोठे असून, या श्रावणी सोमवारास आजपासून प्रारंभ झाला. करोना महामारीमुळे कराड तालुक्यात भाविकांनी घरातच महादेवाची पूजा केली. तर तालुक्यातील किरपे येथील डोंगरावरील महादेव मंदिराचे पुजारी जालिंदर गुरव यांनी मंदिरात जाऊन पूजा करीत भविकावरील कोरोनाचं संकट दूर कर… असे साकडे घातले.
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्यात कुलधर्म कुलाचाराला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरातच आपल्या कुलदैवतेनुसार श्रावण सोमवार, श्रावण शुक्रवार आणि श्रावण शनिवारचे व्रत केले जाते.
यंदा श्रावण शनिवार हा नागपंचमीचा सण घेऊन आला आहे. यंदा करोना काळ असल्याने सर्वत्र शहरबंदी, गावबंदी झाली आहे. यंदा श्रावणी सोमवार या सणावरही महामारीचे सावट आहे. कराड तालुक्यात सदाशिवगड, आगाशिव, किरपे, शामगाव घाट आदी ठिकाणी महादेवाचे मंदिर आहेत.
मोठ्या संख्येने भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात. श्रावणी सोमवारानिमित्त अनेक गावात काही भाविकांनी मंदिरात जाऊन दुग्धभिषेक घालून पूजा अर्चना करून दर्शनही घेतले. या वर्षी मात्र करोनामुळे सोशल डिस्ट्न्स ठेवण्यात आले होते.