न्हावरे -शिरूर तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी सामाजिक भान ठेवून रेशनिंगच्या मालाचे सर्वसामान्यांपर्यंत वितरण करावे, असे आवाहन शिरूरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांनी दैनिक प्रभातशी बोलताना केले.
तालुक्यातील आलेगाव पागा येथील रेशनिंग दुकानामध्ये हरभरा डाळ व तूरडाळ घोटाळा झाला. त्यानंतर तेथील रेशनिंग दुकानाचा परवानाही रद्द झाला. त्यामुळे नायब तहसीलदार यादव यांनी रेशनिंग दुकादारांना दैनिक प्रभातच्या माध्यमातून नियमित रेशनिंग वाटप करण्याचे आवाहन केले.
यादव पुढे म्हणाले की, रेशनिंग दुकानदारांनी त्यांच्याकडील मालाचे वितरण करताना दुजाभाव करू नये. तसेच प्रत्येक कार्डधारकाला त्याच्या हिश्श्याच्या मालाचे योग्य पद्धतीने वाटप करावे, असे यादव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी रेशनिंग माल वितरणात हेराफेरी केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असेही यादव यांनी सांगितले.
आलेगाव पागा येथील रेशनिंग दुकानाचा परवाना घोटाळ्यामुळे रद्द करण्यात आला आहे. येथील ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून आरणगाव येथील जय हरी महिला बचत गटाच्या मार्फत ग्राहकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे.
-ज्ञानदेव यादव,
नायब तहसीलदार शिरूर