साखळी तोडण्यासाठी “ड्रोन’ वॉच ठेवा

सरिता इंदलकर; व्याधीग्रस्त नागरिकांचे स्वॅब कण्हेर आरोग्य केंद्रात घेणार

सातारा (प्रतिनिधी) – कण्हेर (ता. सातारा) येथील वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असून गावातील करोना साखळी तोडण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच ठेवण्याची सूचना सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर यांनी दिल्या. परिसरातील व्याधीग्रस्त नागरिकांचे स्वॅब कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्याची प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असल्याचेही सौ. इंदलकर यांनी सांगितले.

कण्हेर गावात करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने गाव हॉटस्पॉट बनत आहे. या पार्श्‍वभूमीवर सभापती सरिता इंदलकर व गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी गावास भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामदक्षता कृती समितीची तातडीने आढावा बैठक घेतली. कृती समितीच्या केलेला कामांचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना राबवण्याबाबत संजय ढमाळ यांनी सूचना केल्या. सौ. इंदलकर म्हणाल्या, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणाऱ्यांवर ठोस कारवाई करुन लॉकडाऊन काळात योग्य ती खबरदारी घ्यावी. कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यानंतर जे निर्बंध आहेत ते पाळणे गरजेचे आहे.

कण्हेर व परिसरातील आजारी, वृध्द, व्याधीग्रस्त नागरिकांनी स्वॅब देण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने संशयितांचे स्वॅब कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात येणार आहेत. नियम मोडणारांवर पोलीस विभागाने कारवाई करुन गावावर ड्रोनचा वॉच ठेवावा, अशी सूचना इंदलकर यांनी केली. संजय ढमाळ म्हणाले, गावात करोनाचा समूह संसर्ग झाल्याने येथील धोका वाढला आहे. लोकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवून संशयितांचे स्वॅब तपासणीचा कॅम्प लवकरच भरविण्यात येणार आहे.

या बैठकीत वैद्यकीय अधिकारी तेजस्विनी पाटील, विस्तार अधिकारी जितेंद्र काकडे, सरपंच राजश्री चव्हाण, उपसरपंच संतोष चव्हाण, मोहन वाघमळे, ग्रामसेवक बाळकृष्ण सावंत, तलाठी वसंत मुळीक, पोलीस पाटील तेजस जाधव,आप्पा घोडके, कालिदास वाघमळे, आरोग्य सहाय्यक चंद्रकांत जाधव, आशा सुपरवायझर रेखा क्षिरसागर, सोनाली मोकाशी, अंगणवाडी सेविका व मदतनिस, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.