वाठार पोलीस ठाणे गैरसोयींच्या विळख्यात

स्वच्छतेचे तीन तेरा; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा नागरिकांना फटका
जलालखान पठाण
वाठार स्टेशन (प्रतिनिधी) –
करोनाच्या काळात वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात सध्या विविध समस्या भेडसावत आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना तक्रारी देण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फटका सामान्यांना बसत आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलिसांवर कामाचा अधिक ताण आहे. चार ते पाच ठिकाणी कंटेनमेंट झोनसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये सपोनि स्वप्निल घोंगडे हे करोना योद्धा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 47 गावे आहेत. त्यातील वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, वाघोली, सोनके, करंजखोप, देऊर, तडवळे ही संवेदनशील गावे आहेत. या गावातील लोकांना कामानिमित्त पोलीस ठाण्यात यावे लागते. तक्रारदार तक्रार नोंदवत असताना बऱ्याच वेळा विजेचा लपंडाव सुरू असल्याने तक्रार नोंदवण्यास विलंब होतो. तक्रारदारास अन्न, पाण्याविना दिवसभर ताटकळत बसावे लागते. पोलीस ठाण्याचे आवार प्रशस्त असूनही येथे इमर्जन्सी दिव्यांची सोय नाही.

जनरेटर असून नसल्यासारखा आहे. इन्व्हर्टर व दूरध्वनी बंद आहे. वाठार स्टेशनमधून दोन राज्य मार्ग जातात. तेथे नेहमी अपघात होतात. अशा वेळी पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्याने अपघातग्रस्तांपर्यंत लवकर मदत पोहोचत नाही. पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले असून पाण्याची सुविधा नाही. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस नागरी वस्ती आहे. स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीचा त्रास तेथील रहिवाशांना होतो. पोलीस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी माना टाकल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष देऊन गैरसोयी दूर करण्याची मागणी होत आहे.

फिर्याद देण्यासाठी आलेले नागरिक उघड्यावर लघुशंकेला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून आजार वाढण्याची शक्‍यता आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तक्रारदारांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागते. वरिष्ठांनी जनरेटर अथवा इन्व्हर्टरची सोय लवकरात लवकर करावी.
शामराव चव्हाण, माजी विभाग प्रमुख, शिवसेना.

विषय टाळण्याचा प्रयत्न
या गैरसोयींबद्दल वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असमाधानकारक उत्तरे देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.