टीव्हीचा सर्वात लोकप्रिय रिऍलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ त्याच्या 13 व्या सीझनसह सुरू झाला आहे. शो सुरू होऊन काही दिवसच झाले आहेत. दरम्यान, या शोला पहिला करोडपती मिळाला आहे.
हिमानी बुंदेला या दृष्टिहीन असलेल्या शिक्षिका केबीसीच्या 13 व्या सीझनची पहिल्या करोडपती बनल्या आहेत. हिमानी बुंदेला यांनी 1 कोटी रुपयांचे अचूक उत्तर देऊन 7 कोटींचा प्रश्न गाठला आहे. ज्याचा प्रोमो सोनी टीव्हीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.
केबीसीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा दृष्टिहीन स्पर्धक शोचा भाग बनला आहे आणि इतकी मोठी रक्कम त्याच्या नावावर झाली आहे. अंध असूनही आपले स्वप्न सत्यात उतरविणाऱ्या हिमानी बुंदेला कोण आहेत, हे जाणून घेऊया.
हिमानी गणिताच्या शिक्षिका आहेत
हिमानी बुंदेला गुरू गोविंद नगर, आग्रा येथे राहतात. हिमानी शाळेत गणिताच्या शिक्षिका आहेत. त्या सांगतात की, वयाच्या 9 व्या वर्षापासून त्या केबीसी पाहत आहे. केबीसीमध्ये एक दिवस सहभागी होणे आणि सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांना भेटणे हे त्यांचे नेहमीच स्वप्न राहिले आहे, जे आता पूर्ण झाले आहे.
वयाच्या 15 व्या वर्षी अपघात
हिमानी पाहू शकत नाहीत, यामागील कारण त्यांच्यासोबत झालेला अपघात आहे. वास्तविक, हिमानीसोबत वयाच्या 15 व्या वर्षी एक अपघात झाला होता ज्यात त्यांनी त्यांचे दोन्ही डोळे गमावले. हिमानी त्यावेळी नववीत होत्या. शाळेत जाताना त्यांना अपघात झाला. ज्यात त्यांच्या डोळ्याची रेटिना फाटली होती. बरेच उपचार झाले, पण त्या दृष्टी परत मिळवू शकल्या नाहीत. तथापि, यानंतरही त्यांनी धैर्य गमावले नाही आणि आपले ध्येय साध्य करत राहिल्या.
शिक्षण केले पूर्ण
केबीसीच्या 13 व्या सीझनमध्ये एक कोटी जिंकून प्रथम स्पर्धक बनलेल्या हिमानीने त्यांच्या अभ्यासात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. त्यांनी मानवशास्त्रात पदवी घेतली आणि डॉ.शकुंतला विद्यापीठातून बी.एड पदवी मिळवली. त्यानंतर त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
केबीसीत येण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न
हिमानी सांगतात की, केबीसीमध्ये येण्यासाठी त्या गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्या अनेकदा नोंदणीची वाट पाहत असत.
दरम्यान, हिमानी शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देऊन 7 कोटी रुपये जिंकू शकतील का हे पाहणे बाकी आहे. मात्र, हिमानी या प्रश्नाचे उत्तर लॉक करते असे प्रोमोमध्ये दाखवले आहे. आता पुढे काय होईल, हे लवकरच कळेल.