कोलकाता – पश्चिम बंगालमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या निदानासाठीचे टेस्टिंग किट तयार केले आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांना हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचे निदान करणारे हे पहिले भारतीय किट ठरणार आहे.
DIAGSure म्युकरमायकोसिस डिटेक्शन किट हे पश्चिम बंगालमधील बक्राहट भागातील शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. ब्लॅक फंगसच्या निदानासाठी आता जे किट्स उपलब्ध आहेत, त्यांची किंमत साधारणपणे 7 ते 8 हजारांच्या आसपास आहे.
कारण ते विदेशातून आयात केलेले आहेत. मात्र हे नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेले किट विदेशी किट्सच्या तुलनेत स्वस्त असेल, अशी माहिती हे किट बनवलेल्या प्रयोगशाळेचे प्रमुख राजा मजुमदार यांनी दिली.
राजा मजुमदार म्हणाले, उच्च दर्जाचे टेस्टिंग किट रास्त दरात पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजाराची आरटीपीसीआर चाचणी वेगात होऊ शकेल. अशा प्रकारचे किट तयार करणारी आमची पहिली आणि एकमेव भारतीय संस्था आहे. देशाच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही या किटला परवानगी दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.