मॉस्को – कझाकस्तानाच्या द बेक एअर कंपनीचे विमान उड्डाणाच्यावेळी एका दोन मजली इमारतील धडकून झालेल्या अपघातात किमान 14 जण ठार तर 80 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजून 22 मिनीटांनी हा अपघात झाला. उड्डाणाच्यावेळी या विमानाला निर्धारीत अंतरात अपेक्षित उंची गाठता आली नाही त्यामुळे प्रथम हे विमान विमानतळाच्या क्रॉंक्रीट सीमा भिंतीला धडकले आणि नंतर ते जवळच्याच दोन मजली इमारतीला धडकले. अलमॅटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला.
सुदैवाने अपघातानंतर विमानाला आग लागली नाही, त्यामुळे मोठी प्राणहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत. हे विमान नूरसुलतान शहराकडे चालले होते. हे विमान फॉकर-100 या बनावटीचे होते. मध्यम आकारचे हे विमान दोन इंजिनाचे होते. हे विमान बनवणारी कंपनी सध्या बंद पडली आहे. त्यामुळे फॉकर बनावटीच्या विमानांचे उत्पादन सध्या थांबले आहे. दुर्घटनाग्रस्त विमान खूप जुने होते असेही सांगण्यात येत आहे. अपघातांच्या कारणांची चौकशी सुरू आहे.