कॅट्रिना कैफचे नाव बऱ्याच जणांशी जोडले गेले आहे. सगळ्यांत अगोदर सलमान खानशी. मुळात सलमानच तिचा इंडस्ट्रीतला गॉडफादर आहे असे म्हटले तर चुकीचे नाही. बराच काळ या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही येत होत्या.
यथावकाश त्या थांबल्या. पण मधूनच कोणाला तरी सुरसुरी येते. त्यानंतर कॅट्रिनाचे नाव रणबीर कपूरशी जोडले गेले. जोडले गेले म्हणजे ते खरेच होते. दोघांचे निकटचे संबंध दर्शवणारे फोटोही तेव्हा व्हायरल झाले होते. नंतर रणबीर आणि कॅट वेगळे झाले.
कॅट्रिना चित्रपटांत अक्षयसोबत तर चित्रपटांच्या बाहेर पुन्हा सलमानसोबत दिसू लागली. पुन्हा काहींनी त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढला. मात्र बराच काळ उलटसुलट बातम्या छापूनही काही झाले नाही. दरम्यानच्या काळात युलीया आणि जॅकलीन या दोन जणी सलमानसोबत दिसू लागल्या. त्या त्याच्या फार्महाउसवर मुक्कामही ठोकून आल्या. पण सलमानने त्यांना काय कमिट केले आहे हे त्यालाच माहीत.
या काळात अचानक कॅट्रिनाचे नाव विकी कौशलसोबत जोडले गेले. विकी ताजा ताजा फॉर्मात आला आहे. कॅट त्याच्यासोबत बऱ्याच जणांना दिसली. चर्चा झाली आणि नाव जोडले गेले. मात्र जोपर्यंत या दोघांपैकी किमान एकाकडून काहीतरी अधिकृत दुजोरा मिळत नाही तोपर्यंत आपण कसे लग्नाला जायचे म्हणून पत्रकारही गप्प. अखेर अनिल कपूर यांचे पुत्र हर्षवर्धन कपूर यांनी कोंडी फोडली.
काही दिवसांपूर्वीच एका चॅट शोदरम्यान हर्षवर्धनने कॅट्रिना आणि विकीचे रिलेशन असल्याचे सांगून टाकले. यामुळे आपण अडचण ओढवून घेतली असल्याची वाच्यताही बिचाऱ्याने त्याच वेळी केली. अखेर त्याने व्यक्त केलेली भीती खरी ठरली.
सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत असलेला गौप्यस्फोट केल्यामुळे कॅट्रिना हर्षवर्धनवर नाराज असल्याची आता बातमी आहे. ती हर्षवर्धनला ओळखतही नसताना त्याने तिच्याबाबत एका चॅट शोमध्ये बोलण्याचे कारणच काय, हे तिच्या नाराजीमागचे कारण आहे.
विकीने अजून काही खुलासा केलेला नाही. कदाचित तो हर्षवर्धनला ओळखत असावा आणि त्याच्यामार्फत त्याने खडा टाकून पाहिला असावा, अशीही शक्यता आहे. सलमान आणि रणबीर यांच्यामुळे हात पोळले गेलेली कॅट्रिना अत्यंत सावध पावले उचलत असल्याचे कथित सूत्रांचे म्हणणे आहे. जे काही असेल खरे किंवा खोटे ते लवकर बाहेर येईलच.