…अन् करोना देवीच्या मंदिरावर पोलिसांनी फिरवला बुलडोझर

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या एका गावात ग्रामस्थांनी करोना देवीचे मंदिर उभारले होते. त्यात करोना देवीची पुजाही केली जात होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या मंदिरावर बुलडोझर फिरवला असल्याचे सांगण्यात येत आहे. हे मंदिर पाडून संपूर्ण ढिगाराही या भागातून काढून टाकला.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील शुक्लपूर जिल्ह्यात काही ग्रामस्थांना करोनाची लागण झाली होती. गावात करोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. तेव्हा काही ग्रामस्थांनी मिळून करोना देवीचे मंदिर उभारले. या मंदिरात पूजा अर्चा सुरू झाली, इतकेच नाही तर देवीचा प्रसादही वाटण्यात आला. करोना देवीची पूजा अर्चना केल्यास करोना पळून जाईल असे ग्रामस्थांना वाटत होते.

करोना देवीची पूजा करण्यासाठी ग्रामस्थ मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. या माहिती पोलिसांना कळाली तेव्हा त्यांनी तातडीने शुक्लपुर गावात धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने हे मंदिर तोडले, त्याचा ढिगाराही दुसर्‍या ठिकाणी फेकण्यात आला. या मंदिराचे नाव निशाणही ठेवले नाही. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.