लंडन – ब्रिटनचे युवराज विल्यम्स यांच्या पत्नी, राजघराण्यातील सून केट मिडल्टन यांना कर्करोगाची लागण झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालाच्या आधारे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर केट मिडल्टन यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्या, अशा शुभेच्छा जगभरातून देण्यात येऊ लागल्या आहेत. ४२ वर्षीय केट मिडल्टन यांनी स्वतःच आपल्याला कर्करोगाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे.
प्रतिबंधात्मक उपचार म्हणून किरणोत्सर्जन उपचारांची प्राथमिक फेरी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी केसिंग्टन पॅलेसमधून अत्यंत भावनिक व्हिडीओ संदेश त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामध्ये ही माहीती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना लवकर बरे वाटावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांमधून देण्यात येऊ लागल्या आहेत.
जॉर्ज, ल्युइस आणि चार्लोट ही मुले अजून आपल्या आजारपणाचे तथ्य मनापासून स्वीकारू शकलेली नाहीत. याकाळात आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना पूर्ण मनस्वास्थ आवश्यक असल्याने शांतता, खासगी आणि कौटुंबिक वातावरण कायम राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
केट मिडल्टन यांचे सासरे आणि ब्रिटनचे राजे चार्ल्स हे देखील सध्या कर्करोगावरील उपचार घेत आहेत. कर्करोगाची लागण झाल्याचे समजल्यानंतर दाखवलेल्या धैर्याबद्दल राजे चार्ल्स यांनी आपले कौतुक केले आहे, असेही केट मिडल्टन यांनी आपल्या व्हिडीओ पोस्टमध्ये म्हटले आहे.
राजे चार्ल्स आणि राणी कॅमिला दोघेही नियमितपणे आपल्याशी संपर्क ठेवून आहे. आपल्याला सहानुभूती देत असतात. ते यापुढच्या काळातही आपली काळजी घेत असतील. हा त्यांचा मोठा आधार आपल्याला वाटतो आहे, असेही केट मिडल्टन यांनी म्हटले आहे. आपल्या मुलांबद्दल बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, विरोधी मजूर पक्षाचे नेते सर केअर स्टार्मर, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देखील केट मिडल्टन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हाव्यात अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
राजघराण्यापासून विभक्त झालेले आणि सध्या कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झालेले युवराज हॅरी आणि मर्केल यांनीही सोशल मीडीयावरील पोस्टमध्ये केट मिडल्टन यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.