मॉस्को – मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे युक्रेनचा हात असल्याचा संशय अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी व्यक्त केला आहे. या हल्ल्यानंतर देशभर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या गेल्या असल्याचेही पुतीन यांनी म्हटले आहे.
हा हल्ला केल्याची जबाबदारी जरी इस्लामिक स्टेट-खोरसान गटाने स्वीकारली असली, तरी या हल्ल्यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप रशियातील राजकीय व्यक्तींनीही केला आहे. युक्रेनने मात्र हे आरोप सपशेल फेटाळून लावले आहेत.
हल्ला करणारे चारही दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे चौघेही सीमा ओलांडून युक्रेनमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते, असे पुतीन यांनी म्हटले आहे.
मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही. या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभर शनिवारी दुखवटा पाळण्याचे आदेश देखील पुतीन यांनी दिले आहेत.