करतारपूर कोरिडोर भारतीय भाविकांसाठी 9 नोव्हेंबरपासून खुला

लाहोर: पाकिस्तानतर्फे 9 नोव्हेंबरपासून भारतीय शीख यात्रेकरूंना पवित्र करतारपूर साहिब भेट देण्याची परवानगी देण्यात येणार आहे. बहुप्रतिक्षित करतारपूर कॉरिडॉर प्रकल्पाचे प्रमुख असलेले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती घोषित केली. करतारपूर कॉरिडोर उघडण्यावर भारताशी सध्या असलेल्या तणावाचा परिणाम होणार नाही, असे पाकिस्तानने वारंवार म्हटले आहे.

लाहोरपासून सुमारे 125 कि.मी. अंतरावर असलेल्या नरोवाल येथील प्रस्तावित करतारपूर कॉरिडोरला पाकिस्तानी व परदेशी पत्रकारांच्या पहिल्या भेटीदरम्यान प्रकल्प संचालक आतिफ माजिद यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याने भारत आणि पाकिस्तानमधील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली आहे. आतापर्यंत कॉरिडॉरवरील 86 टक्के काम पूर्ण झाले असून तो 9 नोव्हेंबरला यात्रेकरूंसाठी उघडण्यात येणार असल्याचे मजिद म्हणाले.

शीख धर्म संस्थापक गुरु नानक देव यांनी दरबार साहिब गुरुद्वाराची 1522 मध्ये स्थापना केली होती. हा कॉरिडोर पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक मंदिराशी करतारपूरमधील दरबार साहिबला जोडेल आणि भारतीय यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवास शक्‍य होईल. त्यासाठी करतारपूर साहिबला जाण्यासाठी परमिट घ्यावे लागेल. पाकिस्तान कॉरिडॉरद्वारे दररोज 5,000 शीख भाविकांना पाकिस्तानात प्रवेश दिला जाईल याला दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. हा स्वातंत्र्य मिळाल्यापासून दोन्ही शेजाऱ्यांमधील पहिला व्हिसा-मुक्त कॉरिडोरही असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.