गर्भाशय तपासणी मशीन खरेदीचा प्रस्ताव मंजूर
पुणे – महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर निदान करणे सोपे व्हावे, यासाठी गर्भाशय तपासणी करण्याची मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. 11 मशीन्स घेण्यात येणार असून, त्यासाठी 97 लाख 90 हजार रुपये खर्च करण्याला आणि संबंधित कंपनीशी करार करण्याला स्थायीने मंजुरी दिली.
गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या या रोगाचे निदान करण्यासाठी “स्मार्ट स्कोप डिव्हाईस’ यंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे निदान अधिक अचूक आणि तातडीने होऊ शकते. हे उपकरण सध्या ठाणे आणि अलिबाग जिल्हा रुग्णालयात वापरात आहे. याशिवाय अन्य खासगी रुग्णालयांमध्येही त्याचा वापर केला जात आहे.
या यंत्राची निर्मिती “पेरिविंकल टेक्नॉलॉजिज प्रा. लि.’ या कंपनीने केली असून, त्यांच्याकडेच त्याचे पेटंटही आहे. या कंपनीचे मशीन्स महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये घेण्याचा विषय स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. केवळ मशीन्स नव्हे तर या उपकरासोबत त्याला आवश्यक असणारे कन्ज्युमेबल आणि मनुष्यबळही एक वर्षासाठी देण्यात येणार आहे. या काळात महापालिका रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षणही मोफत दिले जाणार आहे. महापालिकेची सध्या 18 प्रसुतीगृहे आहेत. त्यातील 11 रुग्णालयांमध्ये हे यंत्र बसवले जाणार आहे. प्रत्येकी आठ लाख 90 हजार अशी या उपकरणाची किंमत आहे. आरोग्यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.