राजगुरूनगर -खेड तालुक्यातील 34 गावे व तीन नगरपरिषदांमध्ये करोना पसरला असून तालुक्यातील बाधितांची संख्या आता 155 झाली आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे खेड तालुका 10 दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
खेड तालुक्याची लोकसंख्या दहा लाखांवर आहे. याबरोबरच परप्रांतीय नागरिक राहत आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यावर तालुक्यातील अनेक भागात करोना संसर्ग वाढला. सध्या बाधितांकडून त्यांच्या जवळच्या व्यक्तींना संसर्ग झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रांताधिकारी संजय तेली म्हणाले, बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने तालुका लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी सर्व अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. बाधितांसाठी महाळुंगे कोविड केअर सेंटरमध्ये अजून 200 रुग्ण ठेवता यावेत, असे प्रयत्न सुरु आहेत. अधिक 15 डॉक्टर्स देण्यात येणार आहेत. भूमीलेख उपअधीक्षक उमेश झेंडे यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. राजगुरूनगर, चाकण, आळंदी या नगरपरिषदांना ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या गावांना करोनाची झळ
राक्षेवाडी, वडगाव, पापळवाडी, कुरकुंडी, कडूस, पाइट, बुरसेवाडी, वेताळे, वाशिरे, वाजवणे, येलवाडी, सुरकुंडी, निघोजे, बहुळ, कुरुळी, नाणेकरवाडी, म्हाळुंगे, गोलेगाव, साकुर्डी, खराबवाडी, कडाचीवाडी, चऱ्होली खुर्द, बिरदवडी, सांडभोरवाडी, सोळू, वडगाव घेनंद, मेदनकरवाडी, कान्हेवाडी, वाकी खुर्द, दावडी, पिंपरी बुद्रुक, काळूस, आणि कनेरसर या गावांचा समावेश आहे. यांसह राजगुरूनगर, चाकण आणि आळंदी या नगर परिषदांचा समावेश आहे. चाकण नगर परिषद (19), राजगुरूनगर नगर परिषद (10) आणि आळंदी नगर परिषद हद्दीत आतापर्यंत 36 करोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्या आहेत. तालुक्यातील 34 गावे व 3 नगर परिषदा मिळून 64 कंटेंटमेंट झोन करण्यात आले आहेत.
तीन रुग्णवाहिकांसाठी निधी मंजूर
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत खेड तालुक्यात तीन रुग्णवाहिका (ऍम्ब्युलन्स) खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून म्हाळुंगे येथे कोव्हीड केअर सेंटर, आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वाफगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी एक रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 40 लाख 4 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.