पुणे – शहरात शुक्रवारी दिवसभरात नव्याने 807 करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 19, 849 वर पोहोचली आहे. दिवसभरात करोनामुळे 9 बाधितांच्या मृत्युची नोंद झाली आहे.
शहरातील स्वॅब तपासणीची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, बाधित संख्याही दोन दिवसाला नवीन उच्चांक गाठत आहे. शुक्रवारी (दि. 3) सर्वाधिक 4 हजार 250 स्वॅब घेण्यात आले. तर आधीच्या स्वॅबमधील काही अहवाल प्रतीक्षेत होते. साधारण साडेतीन हजार तपासणी अहवालातून ही बाधित संख्या समोर आली आहे. सद्यस्थितीत शहरातील नायडू, ससून आणि खासगी रूग्णालयात मिळून 6 हजार 874 बाधितांवार उपचार सुरू आहेत. त्यातील 389 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 59 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 310 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले.
619 जणांना दिवसभरात डिस्चार्ज
करोनाशी लढून ठणठणीत बरे झालेल्यांची संख्याही गेल्या आठवड्यापासून झपाट्याने वाढू लागली आहे. मागील तीन दिवसांत तब्बल 1 हजार 839 बाधितांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 12 हजार 390 जण ठणठणीत बरे होवून घरी गेले आहेत.