दौंड (प्रतिनिधी) – येथील राज्य राखीव दलातील आणखी दोन जवानांचा करोना विषाणूचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. राज्य राखीव दलातील आठ जवान कालच करोनावर मात करत ते घरी परतले आहेत. त्यामुळे दौंडकरांना काहीसा दिलासा मिळाला होता.
परंतु मंगळवारी (दि. 12) पुन्हा दौंड तालुक्यातील 100 एसआरपीएफ जवान, दहिटणे येथील 16 व तालुक्यातील इतर 2 जणांचे करोना विषाणूच्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 116 जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एसआरपीएफच्या ग्रुप क्र. 7 च्या दोन जवानांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
त्यामुळे बंदोबस्तासाठी जात असलेल्या जवानांची चिंता वाढत आहे. तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. डांगे यांनी केले आहे.