टेनिस सम्राज्ञीला प्रतिष्ठेचा पुरस्कार
नवी दिल्ली – भारतीय टेनिसची सम्राज्ञी म्हणुन ओळखली जात असलेली सानिया मिर्झा हिने आपल्या गुणवत्तेला नव्या उंचीवर नेले आहे. जागतिक टेनिस क्षेत्रात सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘फेडकप हार्ट’ हा पुरस्कार तिला जाहीर झाला आहे.
हा सर्वात मानाचा पुरस्कार पटकावणारी सानिया भारताची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली आहे. या पुरस्कारासाठी सानियाचे काही दिवसांपूर्वीच नामांकन झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नामांकित टेनिसपटू, टेनिसशौकिन व टेनिसचे अभ्यासक यांनी सानियाचे नाव या पुरस्कारासाठी सुचवले.
तसेच टेनिसप्रेमींनी दिलेली मते देखील या निवडीसाठी ग्राह्य धरली गेली होती. जवळपास 10 हजार टेनिसप्रेमींनी सानियाला मत दिले होते. या पुरस्काराच्या शर्यतीत जे खेळाडू होते त्यात जवळपास 60 टक्के मते सानियाच्या पारड्यात पडली व त्याचवेळी हा पुरस्कार तिलाच मिळणार हे स्पष्ट झाले.
पुरस्काराची रक्कम मदतनिधीला देणार….
मानाचा पुरस्कार जरी मिळाला असला तरीही सानियाने त्यातही आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले. करोनामुळे संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी सानियाने या पुरस्कारासाठी देण्यात आलेली रक्कम देणगीदाखल दिली आहे. हा पुरस्कार केवळ माझाच नाही तर सर्व भारतीयांचा आहे, अशा शब्दात सानियाने आपली भावना व्यक्त केली. तसेच या पुरस्काराबद्दल मला जी काही रक्कम मिळेल ती तेलंगाणाच्या मुख्यमंत्री निधीला देणार असल्याचेही तिने जाहीर केले.