कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल होणार?

भाजप आमदाराचा दावा: येडियुरप्पा यांना 2 मेनंतर हटवले जाईल

बंगळूर – कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याचे भाकीत सत्तारूढ भाजपचे ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील-यत्नाल यांनी पुन्हा केले आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना 2 मेनंतर केव्हाही बदलले जाईल, असे यत्नाल यांनी म्हटले आहे.

येडियुरप्पा यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे यत्नाल सातत्याने मुख्यमंत्री बदलाची भविष्यवाणी करत आहेत. त्यासाठी त्यांनी विविध तारखाही दिल्या. आता त्यांनी नेतृत्वबदलासाठी नवी तारीख दिली आहे. कर्नाटकमध्ये लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 17 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यांचा निकाल 2 मे यादिवशी जाहीर होईल. त्याचा संदर्भ देऊन यत्नाल यांनी पुन्हा येडियुरप्पा यांच्यावर निशाणा साधला.

काही मंत्र्यांना आणि आमदारांना येडियुरप्पा यांच्या समर्थनार्थ प्रसारमाध्यमांशी बोलण्यास भाग पाडले जात आहे. ते मंत्री आणि आमदार 17 एप्रिलनंतर येडियुरप्पा यांच्या विरोधात उभे ठाकतील. त्यामुळे 2 मेनंतर नक्की नेतृत्वबदल होईल, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री बदलासाठी यत्नाल यांनी येडियुरप्पा यांच्या वयाचाही (78 वर्षे) आधार घेतला.

भाजपने राजकीय संन्यासासाठी 75 वर्षे वयाचा अलिखित नियम बनवल्याचे मानले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.