नगर – करोना लस, रेमडेसीवीर अन् ऑक्सीजनचाही नगरमध्ये तुटवडा

जिल्हा प्रशासनातर्फे पुरेसा साठा असल्याचा दावा

नगर –  करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये आज लसीचा तुटवडा जाणवला. तर, रेमडेसीवीर व ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करताना दिसले. लस, रेमडेसीवीर, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने करोनावर मात करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

करोना संसर्गावर मात करण्यासाठी शासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यावर भर दिला आहे. 45 वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. तर, आरोग्य, महापालिका, गृह, महसूल, पोलीस, पंचायत राज विभागातील कर्मचार्‍यांना लसी देण्यात आली आहे. फ्रंटलाइनच्या कर्मचार्‍यांना आता दुसरा डोस देण्यात येत आहे.

तर, नागरिकांना पहिला डोस देण्याचे काम सुरू आहे. शहरामध्ये काही खासगी रुग्णालये, महापालिकेचे आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयामध्ये लसीकरण केंद्र आहेत. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दुपारनंतर दररोज लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. आज एका लसीकरण केंद्रावर कर्मचार्‍यांनी चक्क लस उपलब्ध नसल्याचा फलक लावला होता. आज दुपारी सावेडी उनगरातील लसीकरण केंद्रावर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, लस शिल्लक नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.

दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयामध्ये आक्सिजन बेड मिळण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक धावपळ करताना दिसले. तर, ऑक्सिजन मिळत नसल्याच्या काही तक्रारी केल्या. रेमडेसीवीरसाठीही धावपळ करावी लागत असल्याचे काही लोकांनी तक्रारी केल्या. मात्र, दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसीवीरचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचा दावा केलेला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आज लसीचा शून्य साठा होता. त्यामुळे लसीकरण झालेले नाही. सायंकाळी लसीचा साठा उपलब्ध झाला असून, उद्या नियमित लसीकरण होईल.
– अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महापालिका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.