बंगळुरू : – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना कॉंग्रेसने विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली. त्यातून भाजपला रामराम ठोकणाऱ्या शेट्टर यांना दुर्लक्षित करणार नसल्याचा स्पष्ट संदेश कॉंग्रेसने दिला.
कर्नाटकमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. ती निवडणूक लढवण्यासाठी विधान परिषदेच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी 30 जूनला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी कॉंग्रेसने तिन्ही उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये शेट्टर यांचाही समावेश आहे.
सहा वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या शेट्टर यांना यावेळी भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शेट्टर यांनी कॉंग्रेसचा हात हाती घेतला. कॉंग्रेसने त्यांना हुबळी-धारवाड मध्य या त्यांच्या नेहमीच्या मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव झाला.
तसे असले तरी शेट्टर यांच्या राजकीय उंचीचा विचार करून कॉंग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पुन्हा आमदार बनण्याची संधी शेट्टर यांना मिळणार आहे. पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे विजय मिळाल्यास त्यांना विधान परिषद सदस्य म्हणून 2028 या वर्षाच्या मध्यापर्यंत मुदत लाभेल.