बंगळुरू : देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. देशातील अनेक रुग्णालयं रुग्णांनी भरली असून रुग्णाला बेड मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. या लाटेत अनेक राजकीय नेते करोनाच्या कचाट्यात सापडले असून आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनाही करोनाची लागण झाली आहे. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील करोनाची लागण झाली आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस बेळगावात होते. बुधवारी सायंकाळी त्यांना ताप आला होता. त्यावेळी तीन डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचार केले होते.
दरम्यान गुरुवारी सकाळी बेळगावात रोड शोत देखील ते सहभागी झाले होते. पण रोड शो अर्ध्यावर सोडून ते हॉटेलवर परतले. त्यानंतर त्यांनी बंगळुरुला प्रयाण केले. गुरुवारी सकाळी रामय्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी टेस्ट केली. त्यानंतर त्यांना कोरोनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.