बेंगळुरू – कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तीव्र झाली आहे. राजकीय वक्तव्येही आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. दरम्यान, जेडीएस प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी कॉंग्रेस-जेडीएस युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. निवडणुकीत कॉंग्रेस आणि जेडीएसमध्ये युती होणार नसल्याचे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर जेडीएस प्रमुखांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसनेही प्रत्युत्तर दिले. कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले, आम्ही ना त्यांना (जेडीएस) बोलावले आहे ना त्यांना एकत्र येण्यास सांगितले आहे. कर्नाटकातील जनतेने कॉंग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेतला असून, येथे फक्त आमचेच सरकार स्थापन होणार आहे.
त्याचवेळी कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी भाजपवर निशाणा साधला. बीएस येडियुरप्पा यांनी 150 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याच्या वक्तव्यावर सिद्धरामय्या म्हणाले की, भाजप 60 जागाही जिंकू शकणार नाही.
तत्पूर्वी, गुब्बी मतदारसंघातील जेडीएस आमदार श्रीनिवास यांनी कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. विधानसभेसाठी राज्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्याचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे. राज्यात 224 सदस्यांची विधानसभा आहे.