मृद सर्वेक्षण व चाचणी अधिकारी रवींद्र वाडकर
बिजवडी-केंद्र सरकारच्या मृद सर्वेक्षण व चाचणी विभागाच्या वतीने पुणे जिल्हयात सर्वाधिक मातीचे नमुने कर्मयोगीच्या प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. त्यामुळे येथील कर्मयोगी साखर कारखान्याची माती परीक्षण प्रयोगशाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, असे मत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी रवींद्र वाडकर यांनी व्यक्त केले.
बिजवडी येथील प्रयोग शाळेस जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी रवींद्र वाडकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते.
आजतागायत एकूण 64 हजार 889 माती व पाणी नमुन्यांची तपासणी करुन एकात्मिक खत व्यवस्थापनातंर्गत द्यावयाच्या खतमात्रेसह सभासदांना अहवालाचे वितरण करण्यात आले आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्हयात सर्वाधिक 38 हजार 43 नमुने बिजवडी येथील महात्मा फुलेनगर (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी प्रयोगशाळेस दिलेले आहेत. असेही वाडकर यांनी यावेळी सांगितले.
हर्षवर्धन पाटील व पद्मा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2011-12 मध्ये प्रयोगशाळेची स्थापना झाली आहे.
आजपर्यंत तपासणी केलेल्या माती नमुन्यांच्या अहवालाच्या निष्कर्षानुसार पुढील उपाययोजना करणेकामी सभासदांना ना नफा ना तोटा या तत्वावर सेंद्रीय, कंपोष्ट खते तसेच जैविक खतांचे वितरण केले जाते. या खतांच्या वापरांमुळे एकरी ऊस उत्पादनात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी सभासदांनी या अभियानातंर्गत जास्तीत जास्त माती व पाण्याचे नमुने तपासणी करुन घेण्याचे आवाहन कर्मयोगीचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले आहे.
याप्रसंगी मुख्य शेतकी अधिकारी जे. एस. शिंदे, सर्व संचालक, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.