व्हॅलेनटाईन ‘डे’ पार्श्‍वभूमीवर गुलाबाला मागणी वाढली

मागील आठवड्याच्या तुलनेत भावात 40 टक्के वाढ : आवक, मागणी आणखी वाढण्याची शक्‍यता

पुणे : प्रेमी युगलांचा उत्सव असलेल्या व्हॅलेनटाईन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर लाल गुलाबांना मागणी वाढली आहे. त्यामुळे त्या फुलांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात फुलांच्या 20 नगास 160 ते 180 रुपये भाव मिळत असल्याची माहिती अखिल फूलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर आणि प्रसिध्दी प्रमुख सागर भोसले यांनी दिली.

या महत्त्वाच्या बातम्या वाचलात का?

येत्या शनिवारी (दि. 14) व्हॅलेनटाईन डे आहे. या प्रेमाच्या आणाभाका मारत गुलाबाचे फुल देण्याची प्रथा आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डात गुलाबाची आवक वाढली असल्याचे सांगून वीर म्हणाले, जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर तालुक्‍यातून येथील मार्केट यार्डातील फुल बाजारात गुलाबांची जास्त आवक होत आहे. येथून राज्यात नागपूर, गुजरातमध्ये सुरत, बडोदा, मध्यप्रदेश येथील इंदौर, तेलगंणा येथील हैदराबाद, दिल्ली येथे फुलांची निर्यात होत आहे. व्हॅलेनटाईन डे ला आणखी चार दिवस असल्याने शेतकऱ्यांनी माल राखून ठेवला आहे.

येत्या दोन दिवसात आणखी आवक वाढेल. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भावात वाढ होण्याची शक्‍यता आहे. मागील रविवारी गुलाबास 120 ते 140 रुपये भाव मिळाला होता. तो आज वाढला आहे. गेल्या वर्षी साधारणपणे 200 रुपये भाव मिळत होता.

सोशल मीडियाच्या जमान्यात इमेज तसेच व्हिडीओद्वारे प्रेम व्यक्त करण्याच्या भावना दृढ होत असताना लाल गुलाबसही मागणी आहे. मात्र, ती अपेक्षेपेक्षा कमी आहे. केलेल्या कष्टाचा तुलनेत भाव कमी मिळतो. त्यातच फवारणी करत जास्त निगा राखावी लागत असल्याने शेतकरी गुलाबाची लागवड कमी प्रमाणात करत आहेत. नेहमीच्या तुलनेत 70 टक्केच लागवड केली जाते. तर, भोसले म्हणाले, पांढऱ्या, पिवळ्या इतर रंगाच्या फुलांनाही मागणी आहे. या फुलांना भाव लाल गुलाबापेक्षा जास्त मिळाले असून, 20 नगांना 200 रुपये भाव मिळाले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.